समिधाच सख्या या -
दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता
वाहते जीच्यातुनी त्याची जीवन सरिता
खळखळे,अडखळे ,सुके कधी फेसाळे
परी अखंड शोधे वाट समुद्राकरिता !
खडकाळ पंथ तो हि जेथून निघाली
पथ शोधत आली रानातूनी अकेली
नच रम्य राउळे कलापूर्ण व घाट
तीरावरी तुरळक परी अंकुरती वेली
नवपर्णांच्या या विरळ मांडवाखाली
होईल साउली कुणा,कुणास कहाली
तोषेल कुणी शापील कुणी दुर्वास
" या जळोत समिधा भव्य हवी वृक्षाली ! "
समिधाच सख्या या त्यात कसा ओलावा
कोठून फुलापरी वा मकरंद तो मिळावा ?
जात्याच रुक्ष या , एकच त्या आकांक्षा
तव आन्तर अग्नी क्षणभर तरी फुलवावा !
-( कुसुमाग्रज )
No comments:
Post a Comment